Friday, 11 December 2015

दिनविशेष - १२ डिसेंबर २०१५

तिथी
 मार्गशीर्ष शुक्ल १ (१६:०४) 
वार
 शनिवार    
नक्षत्र
 मूळ (२५:५०)
योग
 शूल (९:१७)
करण
 बालव (२७:५७)

मार्तंड भैरव मल्हारी खंडोबा षड्रात्रोत्सवारंभ

मार्तंड (मल्हारी) खंडोबाचा सहा रात्रीचा उत्सव मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीपर्यंत असतो. हा सहा रात्रींचा उत्सव खंडोबाचे नवरात्र म्हणून प्रसिद्ध आहे.
प्रतिपदेला स्नान झाल्यावर घरातील पुरुषांनी देवाची नेहमीप्रमाणे पूजा करावी. देव्हाऱ्यातच लाल वस्त्र टाकून, त्यावर दोन विड्याची पाने ठेवून त्यावर खंडोबाचा टाक ठेवावा. त्याच्या जवळ किंवा समोर ताम्हण ठेवून त्यात थोडे गहू ठेवावे. त्यावर भांडे ठेवून त्यात पाणी सुपारी पैसा टाकावा. त्यावर पाच विड्याची पाने व खोबऱ्याची वाटी हळद लावून ठेवावे. नैवेद्य दाखवून आरती करावी. देवासमोर समईत तेल, समईवात घालून दिवा लावून ठेवावा. अशा रीतीने खंडोबाची पूजा करावी. सहा दिवस रोज पूजा करताना टाक न हलवता फक्त हळद-कुंकू, अक्षता, फुले वाहावीत. मात्र इतर देवांची पूजा नेहमीप्रमाणे करावी. घरातील एकाने सहा दिवस उपवास करावा व अखंड दिवा देवासमोर लावून ठेवावा.
शेवटच्या म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी देवांना नमस्कार करून टाक थोडासा हलवावा. नंतर देवासमोर ठेवलेले ताम्हण उचलून ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असा जयघोष करावा. ताम्हण उचलताना घरातील सर्व लहान थोरांचा सहभाग असावा. ताम्हणातील हळद उडवावी (भंडारा) व नंतर खोबरे प्रसाद म्हणून वाटावे. पुरणपोळी, वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी व इतर लिंबू चटणी कोशिंबीर असं सर्व नैवेद्य दाखवून दिवटीबुधलीने ओवाळून आरती करावी. सवाष्ण-ब्राह्मण जेवावयास बोलवावे.
हे सहा दिवस रोज एक फुलांची माळ खंडोबाला वाहावी. यामागे एक कथा आहे. मार्तंड भैरवाचे मणी व मल्लासुर या राक्षसांबरोबर युद्ध चालू असताना श्री महादेवाला विजय मिळावा म्हणून सप्तऋषींनी मार्तंडभैरव या देवतेचे पूजन केले. जसजसा देवसेनेचा विजय होऊ लागला, तसे एक प्रत्येक दिवशी एक विजयमाळ देवाला वाहिली गेली. तोच विधी आपण घरी बसवलेल्या नवरात्रात करतो अशी मान्यता आहे. (काही ठिकाणी माळेची पद्धत नसते.) ज्या दिवशी देवांना विजय मिळाला, त्या दिवशी देवांचे विधीपूर्वक पूजन करून मार्तंडभैरवाचा जयघोष केला, तेच आपण तळी भरणे यातून करतो. देवांचा विजय झाल्यावर ऋषीमुनींनी मार्तंडभैरवाला अनेक सुवर्ण दिव्यांनी ओवाळले. म्हणून तळी भरल्यानंतर दिवटी-बुधली वापरून देवांना ओवाळावे.

देवदीपावली

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला देवदिवाळी असे नाव आहे. या दिवशी सर्व चित्तपावन ब्राह्मण कुटुंबांतून आपला कुलस्वामी, कुलदेवता व ग्रामदेवता यांना महानैवेद्य अर्पण करण्याचा कुलाचार पाळला जातो. त्याला नैवेद्य घालणे असेही म्हणतात. यावेळी मुख्य देवतांचे नैवेद्य स्वतंत्र पानावर व ग्रामदेवतांचे नैवेद्य त्यांच्या संख्येइतक्या भाताच्या मुद व पक्वान्ने एका पानावर या प्रमाणे मांडतात. वडे-घारगे (भोपळ्याचे गोड वडे) हे मुख्य पक्वान्न या वेळी करतात.
सर्व देवतांना एकाच वेळी नैवेद्य दाखविण्यात येतो. कुलदेवतेचा नैवेद्य घरातील मंडळी सेवन करतात. इतर ग्रामदेवतांचे नैवेद्य बहुधा गाईला घालतात किंवा गुरवाला अथवा गोरगरिबांना देतात. देवदिवाळीला हे जमले नाही तर पुढे चंपाषष्ठीपर्यंत सोयीच्या अशा कोणत्याही दिवशी नैवेद्य घालावेत.

हा दिवस कोकणात कोकणचा बैलपोळा किंवा देवदिवाळीया नावानं साजरा होतो. गाई, बैल, वासरे, म्हशी, रेडे यांच्या शिंगांना रंग लावून, त्यांना गोडधोड खायला घालून हा सण साजरा केला जातो. हा सण म्हणजे पशूधनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे.

अनरक व्रत

एक ऋतुव्रत. हेमंत व शिशिर ऋतूंत हे करतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून याचा प्रारंभ होतो. यात केशवपूजा व 'ॐ नमः केशवाय' या मंत्राचा १०८ वेळा जप करतात.

कात्यायनी व्रत

नंदव्रजातील कुमारिकांनी श्रीकृष्ण पती मिळावा, म्हणून मार्गशीर्ष मासात महिनाभर व्रत केले. त्या प्रात:काळी यमुनेत स्नान करीत व कात्यायनीदेवीची वालुकामय मूर्ती बनवून तिची पूजा करीत.

इष्टी

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

चंद्रदर्शन


अमावास्येला दिसेनासा झालेला चंद्र रविच्या पुढे १२ अंश गेला कि चंद्रदर्शन होते. १९:०७ ला पश्चिमेकडे चंद्रदर्शन होईल. सामुदायिक मुहूर्त ३० म्हणजे साम्यार्घ आहेत. उत्तरशृंग आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Thursday, 10 December 2015

दिनविशेष - ११ डिसेंबर २०१५

तिथी
 कार्तिक अमावास्या (१५:५९) 
वार
 शुक्रवार    
नक्षत्र
 जेष्ठा (२५:२१)
योग
 धृति (१०:१९)
करण
 किंस्तुग्घ्न (२८:०५)

दर्श अमावास्या

अमावस्या ही पर्वतिथी आहे. यावेळी जप,तप, दान, अथवा व्रत केले असता अधिक फलप्राप्ती होते. या तिथीस श्राद्ध केले असता पितर तृप्त होतात.
दर्श श्राद्ध
दर्शाच्या दिवशी केले जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी यांना उद्देशून करतात. हे श्राद्ध नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.

केदारगौरीव्रत

याचा आरंभ कार्तिक अमावस्येस करतात. त्या दिवशी गौरी व केदार यांची पूजा करतात. हे व्रत दक्षिणेत प्रसिद्ध आहे.

गौरीतपव्रत

या व्रताचा आरंभ कार्तिक अमावास्येला करतात. या दिवशी प्रात:स्नान आदि झाल्यावर हातात गंध, अक्षता, फुले, दूर्वा आणि उदक घेऊन

'ईशार्द्धंगहरे देवि करिष्येऽहं व्रतं तव ।
पतिपुत्रासुखावप्तिं देहि देवि नमोऽस्तु ते ॥'

असा संकल्प करावा व मध्यान्ही सूर्यनारायणास अर्घ्य द्यावे आणि
'अहं देवि व्रतमिहं कर्तुमिच्छामि शाश्‍वतम्‌ ।
तवाज्ञया महादेवि निर्विघ्नं कुरु तत्र वै ।'

अशी प्रार्थना करावी. नंतर गौरीपूजन व उपवास करावा. पूजेचे आवाहनादी सहा उपचार झाल्यावर अंगपूजा करून गंधपुष्पादी इतर दशोपचारांनी पूजन करावे आणि गौरीच्या उजव्या बाजूस गणेश व डाव्या बाजूस स्कंद यांचे पूजन करावे. नंतर तांब्याच्या अगर मातीच्या आठ पणत्यांत तुपाचे दिवे ठेवावे, रात्रभर (सूर्योदय होईतो ) ते दिवे तेवत ठेवावे. ब्रह्ममुहूर्तावर (प्रतिपदे दिवशी सकाळी ) स्नान करून नंतर ब्राह्मण दांपत्याची पूजा करावी. तांबे, पितळ व शिसे यांच्या तीन पात्रांत गूळ, काही पक्वान्ने, तीळ-तांदूळ व सौभाग्यद्रव्ये ठेवुन ते दिवे त्यावर ठेवावे आणि बगळे, कावळे आदी पक्षी ओरडू लागेपर्यंत ते न घेता तिथे बसून राहावे.

पक्षी ओरडू लागण्यापूर्वी उठल्यास सौभाग्य नष्ट होते. अशातर्‍हेने, पहिल्या वर्षी अमावास्येपासून,  दुसर्‍या वर्षी प्रतिपदेपासून, तिसर्‍या वर्षी द्वितीयेपासून या क्रमाने व्रत करीत सोळाव्या वर्षाच्या मार्गशीर्ष पौर्णिमेला आठ ब्राह्मण दांपत्ये बोलावून मध्यान्ही सुपूजित गौरीजवळ अष्टदलावर सोम व शिव यांची पूजा करावी आणि तिखट-मिठाचे वडे, गुळपापडी, पुर्‍या, अनरसे, खीर, तूप, साखर व मोदक अशा आठ पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. या आठ पदार्थांनी भरलेली आठ जोडपाने वाढून दांपत्यांना जेवू घालावे, त्यांना वस्त्रालंकार वगैरे अर्पण करावे. ती अन्नपात्रे झाकणांसह दांपत्यांना दान द्यावी. हे व्रत स्त्रियांनी करावयाचे आहे. या व्रताने स्त्रियांना पुत्रप्राप्ती होते आणि त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Wednesday, 9 December 2015

दिनविशेष - १० डिसेंबर २०१५

तिथी
 कार्तिक कृष्ण १४ (१५:२५) 
वार
 गुरुवार    
नक्षत्र
 अनुराधा (२४:२४)
योग
 सुकर्मा (१०:५७)
करण
 चतुष्पाद (२७:४६)

कामावाप्तीव्रत

या तिथीस महाकालाची पूजा करतात.
फल - कामनापूर्ती.

जलकृच्छ्रव्रत

कार्तिक कृष्ण चतुर्दशीस विष्णुपूजा व पाण्यात उभे राहून उपवास करणे, असा या व्रताचा विधी आहे.
फल - विष्णुलोकप्राप्ती.

प्रायश्‍चित्त म्हणूनही हे व्रत करतात. त्यात एक महिनाभर केवळ सातूचे पीठ पाण्यात कालवून खायचे असते. एक दिवस व एक रात्र काहीही न खात पाण्यात बुडून राहून वरुणाच्या मंत्राचा जप केला असत वर्षभर केलेया पापांचे क्षालन होते, असे सांगितले आहे. दिवसा उभे राहून व रात्री न झोपता पाण्यात काळ कंठावा व दुसर्‍या दिवशी १००८ वेळा गायत्रीमंत्राचा जप करावा, असाही पर्याय सांगितला आहे. या व्रताला उदकृच्छ्र, तोयकृच्छ्र, वरुणकृच्छ्र अशीही अन्य नावे आहेत.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

Tuesday, 8 December 2015

दिनविशेष - ९ डिसेंबर २०१५

तिथी
 कार्तिक कृष्ण १३ (१४:१७) 
वार
 बुधवार    
नक्षत्र
 विशाखा (२२:५६)
योग
 अतिगंड (११:१०)
करण
 विष्टी (२६:५५)

शिवरात्रि

कृष्ण चतुर्दशीला शिवरात्रि साजरी करतात. निशीथ काळी (रात्रीचा आठवा मुहूर्त) शिवपूजेचे विशेष महत्व आहे.

श्री. ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव, आळंदी

आळंदी येथे अजानवृक्षाखाली संत ज्ञानेश्र्वर महाराजांनी कार्तिक कृ. त्रयोदशीला जिवंत समाधी घेतली म्हणूनच या स्थानास संजीवन समाधी म्हटले जाते. याठिकाणी आषाढी-कार्तिकी एकादशीला यात्रा भरते तसेच ज्ञानेश्वर समाधी दिनी येथे उत्सव असतो.
ही वारी कलियुगातील मोक्षदायी वारी आहे असे मानले जाते. आळंदी येथे श्रीज्ञानेश्‍वर महाराजांची समाधी आहे. त्यामुळे आळंदीस क्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले आहे. पुराणान्तरी ह्या क्षेत्राचा शिवपीठ म्हणून महिमा गाजत होता. पूर्वी या क्षेत्रास आनंदविपिन, वारुण, कपिल, अलका व सिद्धक्षेत्र अशी पाच नवे असल्याचा स्कंदपुराणात उल्लेख आहे व संतांच्या अभंगात अलंकापुरी, अलंकापूर, अलंकावती या नावांनी आळंदीचा उल्लेख योतो. पुढे शके ६९० त 'अलंदीय' असा उल्लेख सापडतो. त्यासच पुढे 'आळंदी' हे नाव प्राप्त झाले.
श्रीज्ञानेश्‍वरांचा जन्म श्रावण व. अष्टमीच्या मध्यरात्री म्हणजे गोकुळाष्टमीच्या दिवशी, कृष्णजन्माच्या वेळी झाला म्हणून त्यांना विष्णुचा अवतार मानतात. ज्ञानदेवांनी धर्म, अर्थ, काम व मोक्षाचे हे चार पुरुषार्थ सांगून वारकरी सांप्रदायात भक्‍ती हे मोक्ष आणि स्वात्मसुखाचे श्रेष्ठ साधन असल्याचे सांगून, प्रसंगी चमत्कार दाखवून ईश्‍वरभक्‍ती वाढविली. एवढेच नव्हे तर भगवान विष्णु ज्ञानेश्‍वरांच्या रूपाने अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी अवतीर्ण झाले असल्याने त्यांनी

'यारे यारे लहानथोर । याती भलते नारीनर ।'
करावा विचार । न लागे चिंता कोणासी ॥'

असे म्हणून सर्व अधिकारांच्या लोकांना पाचारण केलेले आहे.
ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्ठी, हरिपाठ व अभंग इ. ग्रंथ मुमुक्षूंसाठी लिहून ठेवावे. नंतर ज्ञानदेवांना आपले इहलोकीचे कार्य समाप्त झाले, असे वाटले. म्हणुन पांडुरगाजवळ त्यांनी समाधीची अनुज्ञा मागितली. पांडुरंगाकडून वचन मिळाले ते-

कृष्णपक्षीं तुज निर्धारा । भेट देत जाईन ॥५॥
कार्तिक शुद्ध एकादशी । पंढरीयात्रा होईल सरिशी ।
दुसरी कृष्णपक्षी निर्धारेसी । तुज दिधली असे ॥६॥

असे वचन मिळताच ज्ञानेश्‍वरांनी जिवंत समाधी घेण्याचा आपला निर्धार जाहीर केला.

अमृतयोग

२२:५६ नंतर बुधवारी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे होणारा अमृतसिद्धी योग होत आहे. हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

भद्रा


१४:१७ नंतर २६:५५ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.  विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Monday, 7 December 2015

दिनविशेष - ८ डिसेंबर २०१५

तिथी
 कार्तिक कृष्ण १२ (१२:३५) 
वार
 मंगळवार     
नक्षत्र
 स्वाती (२०:५६)
योग
 शोभन (१०:५८)
करण
 गरज (२५:३०)

भौम प्रदोष

सूर्यास्तानंतर पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम मानाने  साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष काळ असतो.
प्रत्येक चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास करतात.
कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन ' मम पुत्रादिप्राप्तिकामनया प्रदोषव्रतमहं करिष्ये ' इ. संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व षोड्शोपचारे पूजा करावी.

भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । 
रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । 
ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥

भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा लावताना आठ वेळा नमस्कार करावा. ' धर्मस्त्वं वृषरूपेण ' या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला स्पर्श करुन ' ऋणरोगादि' या पूर्ण मंत्राने शंकर , पार्वती आणि नंदिकेश्वराची प्रार्थना करावी. हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
Ø  सोमवार: शांतीरक्षणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø  मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी भौम प्रदोष करावा.
Ø  शुक्रवार: सौभाग्य किंवा स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø  शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा. 

Ø  रविवार: आयुर्दायासाठी अर्कप्रदोष हे व्रत करावे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट