Saturday, 18 July 2015

श्री गणेशा

मी सौ. प्राची शिंदे.
गेले तीन-साडेतीन वर्ष झाले ज्योतिष शास्त्राचा अभ्यास सुरु केला आहे.
वास्तविक पाहता ३-४ वर्षापूर्वी माझा या शास्त्रावर अजिबात विश्वास नव्हता. हे खरंच शास्त्र आहे का या विचारातूनच मी या अभ्यासाला सुरवात केली. मात्र जसजसा अभ्यास सुरु केला तसतसे याचा शास्त्रशुद्ध दृष्ट्या अधिकाधिक अभ्यास करण्याची प्रेरणा मिळत गेली.
आपल्या पूर्व जन्मीच्या पाप पुण्यासाहित आपण जेव्हा जन्म घेतो, त्यावेळी आकाशात जी ग्रहस्थिती असते, अर्थातच आपली जी जन्मकुंडली असते त्यावरून भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांच्याबद्दल आपण कालगणना करू शकतो हि संकल्पनाच मुळात खूप चित्तवेधक आहे. शिवाय ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र यांची इतकी सुरेख गुंफण आहे कि यामुळे ईश्वराच्या अधिकाधिक जवळ जाने शक्य होत आहे.

गेले काही दिवस, मी सातत्याने पंचांग व दिनविशेष लिहून Whats app वरील ज्योतिष प्रेमी group वर post करत आहे. दिनविशेष म्हणजे त्या त्या दिवशीचे महत्व!
यामध्ये साधारणत:
१) ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने तिथी, वार, नक्षत्र, योग कारण यांच्या माध्यमातून होणारे योग
२) खगोलशास्त्राच्या दृष्टीने होणारे ग्रह गोलांचे योग, म्हणजे ग्रहण, युती इ.
३) आपण साजरे करणारे सणवार यांची माहिती आणि त्या संबंधित प्रचलित पौराणिक कथा
इ. गोष्टी समाविष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे.
हे करत असताना एक गोष्ट विशेषत्वाने जाणवली. ती म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या रूढी- परंपरा, साजरे केले जाणारे सण हे सगळे  नुसते थोतांड नसून प्रत्येक रूढीच्या मागे शास्त्रीय कारण आहे.
सणाच्या दिवशी पालन करायच्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे आचरण करायचे नियम, नैवेद्यासाठी सांगितलेले पदार्थ (आणि काही वेळा तर स्नानाच्या वेळी वापरायचे उटणे यांचा पण उल्लेख आहे),  त्या सगळ्याच्या मागे खूप मोठा विज्ञानिक अभ्यास आहे.   उदाहरणच द्यायचे झाले तर मकर संक्रांतीच्या वेळी जेव्हा वातावरणात थंडी असते आणि प्रकृतीमध्ये कफ प्रव्रुती अधिक प्रमाणात असते, अशावेळी उष्ण असे तीळ आणि गुळ यांचा वापर सुचवलेला आहे. कदाचित आपल्या ऋषीमुनिना हे अंत:स्फूर्तीने माहित असावे किंवा त्यांचा तसा प्रचंड अभ्यास असावा.
हा आता काळाच्या ओघात काही रुढींचे अपभ्रंश झाले असतील किंवा बदलत्या रहाणीमानानुसार काहींचे अन्वयार्थ बदललेले असतील याची शक्यता नाकारता येत नाही. पण म्हणून ऋषी-मुनी वेद पुराणात जे सांगून गेले ते सहजपणे डावलणे योग्य वाटत नाही.
आणि हे सगळे whats app च्या group मधील ठराविक लोकसमुहापुरते मर्यादित राहू नये म्हणून या blog लिहायला सुरवात करतेय.  

No comments:

Post a Comment