Tuesday, 22 September 2015

दिनविशेष - २५ सप्टेंबर २०१५

तिथी
 भाद्रपद शु १२ (१९:०१)
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 धनिष्ठा (२६:२६)
योग
 सुकर्मा (०८:३०), धृति (२८:५२)
करण
 बव (०८:२९), कौलव (२९:२५)

प्रदोष

सूर्यास्तानंतर पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम मानाने  साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष काळ असतो.
प्रत्येक चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास करतात.
कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन ' मम पुत्रादिप्राप्तिकामनया प्रदोषव्रतमहं करिष्ये ' इ. संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व षोड्शोपचारे पूजा करावी.
भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥
भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा लावताना आठ वेळा नमस्कार करावा. ' धर्मस्त्वं वृषरूपेण ' या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला स्पर्श करुन ' ऋणरोगादि' या पूर्ण मंत्राने शंकर , पार्वती आणि नंदिकेश्वराची प्रार्थना करावी. हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
Ø  सोमवार: शांतीरक्षणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø  मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी भौम प्रदोष करावा.
Ø  शुक्रवार: सौभाग्य किंवा स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø  शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा. 
Ø  रविवार: आयुर्दायासाठी अर्कप्रदोष हे व्रत करावे.

दधिदान-क्षीरव्रत

भाद्रपद शुक्लपक्षी श्रवणयुक्त द्वादशीचे दिवशी रात्री देवपूजा करावी; रात्री असंभव असेल तर दिवसास करावी; आणि दधिव्रत निवेदन करून दधिदान करावे व दुग्धव्रताचा संकल्प करावा. या पयोव्रताविषयी दुधापासून होणारे व दुधामध्ये शिजविलेले पदार्थ वर्ज्य करावे. दही इत्यादि वर्ज्य करू नयेत. याप्रमाणे दधिव्रतामध्ये ताक इत्यादि वर्ज्य नाहीत. प्रसूत झालेल्या गायीचे दहा दिवसांमधील दूध आणि संधिनी (वृषभाने आक्रमलेली) गायीचे दुध यांचा ज्या ठिकाणी निषेध सांगितला आहे तेथे त्या दुधापासून होणारी दही, ताक इत्यादि सर्व वर्ज्य करावी.

वामन जयंती / वामनद्वादशी

भाद्रपद शुक्लपक्षी श्रवणयुक्त द्वादशीचे दिवशी मध्याह्नकाली वामनाचा अवतार झाला. बळी राजाला पाताळात घालून वामनाने देवांन स्वर्गलोक परत मिळवून दिला व आपण पाताळात द्वाररक्षक म्हणून राहिला. या दिवशी वामनपूजा करून पांढरी वस्तू दान द्यावी. याने मोक्ष मिळतो.
मध्याह्नकाली नदीच्या संगमावर स्नान करून सुवर्णमय वामनाचे प्रतिमेची पूजा करून सुवर्णपात्राने अर्घ्य द्यावे. पूजेविषयी मंत्र
नमस्ते पद्मनाभाय नमस्ते जलशायिने ।
तुभ्यमर्घ्यं प्रयच्छामि बालवामनरूपिणे ॥
नमः शार्ङधनुर्बाणपाणये वामनाय च ।
यज्ञभुक्‌फलदात्रे च वामनाय नमो नमः ॥"
नंतर दुसर्‍या दिवशी सपरिवार वामनाची मूर्ति ब्राह्मणाला दान करावी; दानाचा मंत्र-
"वामनः प्रतिगृह्णाति वामनोहं ददामि ते ।
वामनं सर्वतोभद्रं द्विजाय प्रतिपादये ॥"

अवियोग द्वादशी

या दिवशी शिव, गौरी, ब्रह्मा, सावित्री, विष्णू, लक्ष्मी, सूर्य, नि क्षुभा यांची पूजा करावी, असे सांगितले आहे.

ओघद्वादशी

भाद्रपद शु. द्वादशीला ओघद्वादशी असे दुसरे नाव आहे.

कल्कीद्वादशी

भाद्र. शु. द्वादशीचे कल्कीद्वादशी असे दुसरे नाव आहे. या दिवशी कल्की या अवताराची पूजा करावी, असे सांगितले आहे.

महाद्वादशी

भाद्रपद शु. द्वादशीला श्रवण नक्षत्र असेल तर तिला महाद्वादशी असे म्हणतात. या दिवशी उपवास आणि विष्णूची पूजा या गोष्टी करावयाच्या असतात. याच तिथीला बुधवार व श्रवण नक्षत्र असेल तर तिचे माहात्म्य अधिक आहे. हे व्रत केल्याने महाफल मिळते.

घबाड

२६:२६ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: उत्तरा फाल्गुनी
चंद्र नक्षत्र : शततारका
तिथी: १३
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १३
१३ x ३ = ३९
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १३ तिथी मिळवू : ३९+१३ = ५२
आता ७ ने भागू  ५२ / ७ = ७ ३/७

बाकी ३ म्हणून घबाड.

संदर्भ
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment