Monday, 5 September 2016

दिनविशेष - ६ सप्टेंबर – २०१६



तिथी
 भाद्रपद शुक्ल ५ (२३:३६)  
वार
 मंगळवार
नक्षत्र
 स्वाती (२२:३८)
योग
 ब्रह्मा (९:२०)
करण
 बव (१०:२२)

ऋषिपंचमी

भाद्रपद शुक्ल पंचमी दिवशी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्‍य आदी सर्व स्त्रियांनी नदीवर स्नान करून आपल्या घरातील पवित्र जागी ( देवघरात ) हळदीचे चौकोनी मंडळ करावे व त्यावर सप्तर्षींची स्थापना करून गंध, फुले, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा व
'कश्‍यपोऽत्रिर्भरद्वाजो विश्‍वामित्रोऽथ गौतम: ।
जमदग्निवंसिष्ठश्‍च सप्तैते ऋषय: स्मृता: ।
गृहीत्वार्घ्यं मया दत्तं तुष्टा भवन्तु सर्वदा ।'
असे म्हणून अर्घ्य द्यावा. यानंतर न नांगरलेल्या जमिनीवरील उत्पन्न झालेले शाकादी पदार्थ खाऊन व्रत करावे. याप्रमाणे सात वर्षे करून आठव्या वर्षी सप्तर्षीच्या सोन्याच्या मूर्ती करून त्या कलशावर स्थापन कराव्या व त्यांची पूजा करावी. सात गोदाने आणि सात दांपत्यांना भोजन घालून मूर्ती विसजन कराव्यात. काही ठिकाणी स्त्रिया पंचताडी नावाचे तृण व भावाने दिलेले तांदूळ यांचे कावळें वगैरेंना बली देऊन, मग स्वत: जेवतात.
स्त्रियांच्या मासिक पाळीतील संपर्क दोष नाहीसे होण्यासाठी स्त्रियांनी व पुरुषांनीही हे व्रत अवश्य करावे.

आलेख्य सर्पपंचमी

हे तिथिव्रत आहे. भाद्रपद शुक्ल पंचमीला रंगीत रांगोळीने नाग काढून त्याची पूजा करतात. व्रताचे फल-सर्पापासून अभय.

दृष्टोद्धरण पंचमी

ज्याचा आप्तस्वकीय सर्पदंशाने मरण पावला असेल, त्याने हे व्रत करावयाचे असते. भाद्रपद शुक्ल पंचमी ही या व्रताची आरंभतिथी होय. व्रतावधी एक वर्ष. या व्रतात सोने, चांदी, लाकूड किंवा चिकणमाती यांची पंचफणायुक्‍त नागप्रतिमा तयार करून तिची पूजा करतात. प्रत्येक महिन्याला नागाच्या बारा नावांपैकी एकेका नावाने ही पूजा करावयाची असते.
फल - सर्पदंशाने मृत झालेल्या मनुष्याचा उद्धार.

नागदृष्टोद्धरण व्रत

एक काम्य व्रत. भाद्रपद शुक्ल पंचमीला या व्रताचा प्रारंभ करतात. व्रतावधी एक वर्ष. या व्रताचा विधी असा - व्रतधारी व्यक्‍ती चतुर्थीला एकभुक्त व पंचमीला नक्त करतात. सोने, रूपे, काष्ठ किंवा माती यांची पाच फणा असलेली नागाची प्रतिमा करून तिला पंचामृताने स्नान घालतात. नंतर पंचोपचारे पूजा करतात. पूजेसाठी विशेषत: कण्हेरी, जाई व कमळ ही फुले घेतात. खीर व मोदकांचा नैवेद्य दाखवून ब्राह्मणभोजन घालतात. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पंचमीला मासपरत्वे नागांच्य़ा निरनिराळ्या नावांनी असाच पूजाविधी करतात. उद्यापनाच्या वेळी विष्णूचे स्मरण करून सुवर्णाची नागप्रतिमा आणि सवत्स धेनू दान देतात. यथाशक्‍ती ब्राह्मणभॊजनही घालतात.

जैन संवत्सरी

जैन संप्रदायातील लोक भाद्रपद महिन्यात पर्यूषण पर्व साजरे करतात. श्वेताम्बर संप्रदायाचे  पर्यूषण ८ दिवस असते तर  दिगंबर संप्रदायाचे लोक १० दिवस पर्यूषण पर्व साजरे करतात. त्यांस 'दसलक्षण' असेही म्हणतात.

घबाड

२३:३६ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: पूर्वाफाल्गुनी
चंद्र नक्षत्र : विशाखा
तिथी: ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

दग्ध योग

२३:३६ पर्यंत मंगळवारी पंचमी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment