Sunday, 30 October 2016

दिवाळी पाडवा




बलिप्रतिपदा

कार्तिक शुक्ल प्रतिपदा विक्रम संवत्सराचा आरंभ-दिवस. हा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी मुहुर्त आहे. प्रात:काळी अभ्यंगस्नान करून नवीन वस्त्र परिधान करावे. ह्या दिवशी सार्वजनिक लोकोपयोगी रस्ते, शाळा, नदीचे घाट, पूल, तलाव, वाचनालय इ. कार्यास प्रारंभ करावा. 

वहीपूजन

नव्या वहीची पूजा करून त्यात जमा खर्च लिहिण्यास सुरवात करावी. या दिवशी व्यापारी लोक आपल्या जमाखर्चाच्या वह्या, शाईची दौत, लेखनसाहित्य यांची पूजा करतात, काही व्यापारी या दिवसापासून व्यापारी वर्ष चालू करतात.

पतीस ओवाळणे

सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या पतीस ओवाळावे. रात्री बळीची पूजा करून त्यास दीपदान करावे. गादीवर तांदळाने बळीची आकृती काढून तिची पूजा करावी. ह्या दिवशी रात्री खेळ, गायन वगैरेंचा कार्यक्रम करून जागरण करावे.

अन्नकूट

अन्नाच्या ढीगावर गोपालकृष्ण ठेवून त्याची पूजा करावी. गाय म्हणजे लक्ष्मी आणि खोंड म्हणजे कुबेर समजून त्यांची पूजा करावी.
कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवशी जेवणात नेहमीच्या पदार्थांखेरीज यथाशक्ती इतर पदार्थ, जसे - भात, आमटी, कढी, भाजी इ. कच्चे; पुरी, खीर; शिरा इ. पक्के; लाडू, पेढे, बर्फी, जिलबी इ. गोड; केळी; संत्री, डाळींबे, सीताफळे इ. फळे; वांगे, मुळा, कांद्याच्या पाती इ. भाज्या; चटणी, मुरंबा, लोणचे इ. तिखट-मिठाचे पदार्थ- असावेत व त्यांचा नैवेद्य श्रीकृष्णास दाखवावा. याखेरीज इतर काही पदार्थ तयार करून त्यांचाही नैवेद्य दाखवावा. ब्राह्मणांना पोटभर अन्न वाढून उरलेले इतर इच्छुकांना देऊन टाकावे. खरे पाहता गोवर्धन पूजेचाच हा एक विधी होय.
यादिवशी मिठाईच्या पदार्थांची देवापुढे रास उभारतात. राजस्थानमधील नाथद्वार, काशीतील अन्नपूर्णा मंदिर या ठिकाणी या दिवशी भाताचे डोंगर असतात. उदेपूर येथे मिरवणूक निघते.
फल - श्रीविष्णूची प्राप्ती

गोवर्धन पूजन

कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवशी सकाळी घराच्या दाराजवळच्या भागात शेणाने गोवर्धनपर्वताचा आकार तयार करावा. शास्त्रानुसार शिखरयुक्त,  झाडे-झुडपांनी व्यापलेला व फुलाफळांनी दाटालेला असे याचे वर्णन आहे; पण काही ठिकाणी त्याऎवजी तो मनुष्याकार करून फुलांनी सजवितात. या वृक्षाची गंध-फुलांनी पूजा करून.
'गोवर्धन घराघर गोकुलत्राणकारक
विष्णुबाहुकृतोच्छाय गवांकोटि प्रदोभव ।'
नंतर भूषणीय गाई-बैलांना आवाहन करून यथाविधी पूजा करावी. त्या दिवशी गाईचे सर्व दूध वासरांना पाजावे.
'लक्ष्मीर्या लोकपालानां धेनुरूपेण संस्थिता ।
घृतं वहति यज्ञार्थे मम पापं व्यपोहतु ।'
अशी प्रार्थना करून रात्री गाईंकडून गोवर्धनाचे उपमर्दन करावे.
 

No comments:

Post a Comment